प्रगती पत्रक नोंदी

सुस्वागतम

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Friday, 22 December 2017

*वेळामवस्या लातूर-उस्मानाबादचा सर्वात जिव्हाळ्याचा सण...*
        🖊सनिदेवल जाधव

    लातूर, उस्मानाबाद (पुर्वीचा संपूर्ण उस्मानाबाद जिल्हा)आणि लगतच्या कर्नाटकातील जिल्ह्यात मार्गशीर्ष महिन्यातील अमवस्या ही वेळामवस्या म्हणून सर्व शेतकरी साजरी करतात. मुळात हा सण कर्नाटकातील असून त्याला वेळीअवमस्या म्हटले जाते त्याचा मराठी अपभ्रंश वेळअमवस्या, वेळामवस्या, यळवस झालेला आहे. लातूरकर कोठेही असोत या दिवशी आपल्या शेतात सहकुटुंब येतात म्हणजे येतातच. आज वेळअमवस्या हा सण साजरा केला जाणार. या काळात शेतात गहू, ज्वारी, तुर व हरभरा आलेला असतो. त्यामुळे शेतात गव्हाच्या ओंब्या, हरभऱ्याचे डहाळे, वटाण्याच्या शेंगा, ऊस, बोरे,तुरीच्या शेंगा असा रानमेवा खाण्यासाठी मुबलक असतो. तसेच हौसी लोक मोहळाचीही शिकार करतात. थंडी अधिक पडल्यास मधाचा अस्वाद विरळच. आंबीलाच्या चवीची वाटतर बारा महीने पाहीली जाते. मातीच्या बिंदगीतली आंबीलतर अमृततुल्य! आदल्या रात्री 'माय' रात्रभर जागून डालभर स्वयपाक करते. सकाळी बैलगाडी सजवून बळीचं कुटुंब शेताकडं कुच करतं. शेतकरी शेतात एक खोप (कोप) तयार करून त्याच ठिकाणी धान्याची आणि मांडलेल्या पांडवांची पूजा करून एका अर्थाने वनराईची भक्तीभावाने पूजा करतो. या पुजेसाठी नैवाद्य ही खास असतो. त्यामध्ये , शेंगदाण्याचे लाडू, बोरे, जांभ, हरभार्याची ओली भाजी, ताक आणि ताक,लसूण व भाकरीच्या पीठापासून तयार केलेले अंबील, विविध भाज्या एकत्र करून तयार केलेली भज्जी आणि ज्वारी, गहू, बाजारीचे (सजगुर्याचे) उंडे याचा समावेश असतो. गोड पदार्थ म्हणून तिळगुळाची पोळी आणि गव्हाची खीर असते. त्याच प्रमाणे काही ठिकाणी पांढरी ज्वारी सडुन तयार केलेला आंबटभात ही असतो. आंबील वाटीत घेऊन शेतकरी भाऊ-भाऊ , पिता-पुत्र , आजा-नातू आदी पुऱूष पुजेभोवती प्रदिक्षणा घालतात. तसे करताना "चोर चोर चांगभला, पाऊस आला घरला पळा, हरहर महादेव, इडापिडा टळू दे बळीचं पाज्य येऊ दे" घोष केला जातो. या पुजेचे वैशिष्ठ म्हणजे यात कुठलेच पौराहीत्य, आरत्या नसतात. उंड्यावरच ज्योत पेटवली जाते. मंत्र नसतात की कोणतीच पोथी. सगळी पुजा स्वत: बळीराजा करतो. हा सण साजरा करताना त्याच्या चेहर्यावर भावाची चिंता नसते की उत्पन्नाची. दुपारच्या वेळी 'उतू दवडलं' जातं. म्हणजे शेवाया एका छोट्या बोळक्यात घालून गोवर्यांवर शिजवल्या जातात. त्याचे उतू घालवतात. ज्या दिशेला उतू जाते त्या दिशेला चांगले पिक येणार्या काळात येईल अशी भावना असते. दुपारी थोडीशी वामकुक्षी हानून सायंकाळी कडब्याच्या पेटत्या पेंड्या हातात घेऊन 'हेंडगा' खेळला जातो. पेटती पेंडी घेऊन शेताला प्रदक्षणा घातली जाते. याने पिकावर रोगांचा प्रार्दुर्भाव होत नाही अशी धारणा आहे. शेतकरी सर्वसामान्यपणे या दिवशी नातेवाईक, मित्र परिवाराला वनभोजनासाठी आग्रहाने निमंत्रीत करीत असतो. अगदी धुर्यावरून जाणार्या अनोळख्यालाही हाळी देऊन बोलावतात. जेवणाचा आग्रह धरतात. जेवण केलेले असल्यास आंबील दिले जाते. वेळामवस्येच्या पूर्वसंध्येपासूनच ग्रामीण भागात मुक्कामाला जाणाऱ्या एस.टी. बसला प्रवाशांची मोठी गर्दी होत असते. बसचे कर्मचारीही या दिवशी आर्ध्या का होईन रजेची मागणी करतातच. काही रोडवरचे शेतकरी बस थांबवून चालक-वाहकास आंबील देतात. लातूर जिल्ह्यात या दिवशी सार्वजनिक शासकीय सुट्टी घोषीत केलेली असते. आणि लातूर शहरात अघोषीत संचारबंदी असते. लातूरात ज्या दिवशी रस्त्यावर चिटपाखरू नसते त्या दिवशी वेळामवस्या आहे असे समजावे. वर्षातला कोणताही सण लातूर जिल्ह्यात एवढा ठसा उमटवू शकत नाही जेवढा वेळामवस्या उमटवते. लातूरचे साहेब जेव्हा हयात होते तेव्हा जगात कोठेही असतील तेथून वेळामवस्येला बाभळगावला यायचेच. दुसर्यादिवशी लातूरकर पेपरात त्यांच्या पुजेचा फोटा पाहून सुखावयाचे. ज्यांना शेत नाही आणि आमंत्रणही नाही ते लोक शहरातील डॉ. बाबासाहेब आंबडकर पार्क, विलासराव देशमुख पार्क, विराट हनुमान परिसरात वनभोजनाचा आनंद घेतात. दुसर्या दिवशी उरलेल्या भजीवर तावही हानला जाते. सकल महाराष्ट्राला हेवा वाटावा असा सण लातूर-उस्मानाबादला साजरा होतो.
यळवशीच्या सर्वाना शुभेच्छा!

-सनिदेवल जाधव
मु. ढाकणी पो. निवळी
ता.जि.लातूर
9623594111


वेळ अमावस्या

अमावस्या म्हणजे भूत-प्रेतांचा दिवस (रात्र),
अशुभ-अमंगळ घडण्याची शक्यता अधिक हे शब्द कानी पडलेले असतातच पण आमचा मराठवाडा विशेषतः लातूर,उस्मानाबाद आणि नांदेड,बीड चा भाग अमावस्येचा सन हि आनंदाने साजरा करतो. हि अमावस्या म्हणजेच “वेळ अमावस्या”.येळ-अमोश्या, एलामास असे स्थानिक अपभ्रंश झालेला हा शब्द.अतिशय आनंदाने,उत्साहाने साजरा होणारा सन.मुळातील शब्द हा ‘येळी अमावस्या’ असून त्याचे नामकरण हे ‘वेळ किंवा येळ अमावस्या’ असे झाले. कर्नाटकात पेरणीनंतर येणारी सातवी अमावस्या म्हणजे ही येळी अमावस्या असते.

दर्श अमावास्येला आपल्या सग्या-सोयर्‍यांना,मित्रांना
अन अपरिचित पाहुण्यांनाही शेतकरी शेतात जेवायला घालतात.

शेतात समृद्धी,सुबत्ता लाभावी अशी प्रार्थना घरच्या लक्ष्मीसह शेतकरी कुटूंबिय लक्ष्मीआई पुढे करीत असतात.सर्वदात्या काळ्या आईचे आपण काहीतरी
देणं लागतो या पवित्र भावनेने दर्श अमावस्या ही ‘वेळ अमवस्या’ म्हणून साजरी करण्याची प्रथा आहे. शुभकार्यात अमावस्या या तिथीला निषिध मानले जाते.मात्र अमावस्या ही लक्ष्मीच्या पुजेसाठी महत्वाची असते.

दिपावलीमध्ये कुबेर लक्ष्मीचे पुजन अमावस्येदिवशी होते. तिजोरीची पुजा,वहिची पुजा व्यापारी अमावस्येदिवशीच करतात तर वेळ अमावस्येदिवशी शेतामध्ये कडब्याची कोप करून शेतातल्या लक्ष्मीची पुजा केली जाते.तसेच पिकांची देखील पुजा केली जाते.पाच खडे कव व चुण्याने रंगवून पांडवाची पुजा मनोभावे केली जाते.

हा सण,ही प्रथा एक वेगळीच पर्वणी असते.येथे भेदभाव अन दुरावा बाजूला सारून माणूसपणाची ऊब वाढलेली असते. ह्या दिवसात पेरलेली पिके बहरलेली असतात. वातावरणात थंडी असते,त्यामुळे अशा दिवसांत जेवण जास्त जातं अन ते शरीराला आवश्यकही असत. अशा वेळेस शेत असणारी मंडळी आपल्या मित्र-मैत्रिणी, पाहुणे,शेजारी अशांना आपल्या शेतात जेवायला येण्याचं निमंत्रण देतात.जसा सण निराळा आहे तसाच पोटोबासाठी बेतही निराळाच असतो.आंबट ताक-दहयाच आंबिल हे आदल्या रात्री बनवून एका ‘बिंदग्यात’ (माठ) भरून ठेवलं जात.

आंबिल असते विशेष
आंबिल हे या सणाच खास आकर्षण असत.थंडगार आंबिलची एक वेगळीच ‘नशा’ असते.केवळ आंबिलावर हा बेत थांबत नाही,सोबत असतात नेहमीपेक्षा निराळे असे खास गावराण पदार्थ!या दिवशी विविध भाज्या एकत्र करून शिजवलेली भज्जी असते या भज्जीची चव जगातल्या कोणत्याच मिक्स-व्हेज भाजीला येणार नाही इतकी चवदार,ज्वारीचे उंडे असतात, ज्वारी किंवा बाजरी ची भाकरी, गुळाची पोळी, धपाटे आणि गोड भात! खरिपातील केवळ तुरीची रास होणे बाकी असते.

तूरही ऐन बहरात असते व रब्बी हंगामातील पेरणी होऊन संपूर्ण शेत हिरवेगार झालेले असते. उन्हाची तीव्रता नसते.उसाचे गाळप सुरू होत असल्यामुळे ऊस खाण्याची हौस भागवता येते.गूळ,रस हाही आनंद उपभोगता येतो.असा बेत हा जिभेचे चोचले तर पुरवतोच शिवाय थंडीच्या दिवसात शरीराला ऊर्जाही मिळवून देतो.

सध्या प्रचलित होत असलेल्या हुरडा पार्ट्या खरे तर आम्ही मराठवाडेकर या वेळ अमावसेच्या माध्यमातून अनेक वर्षां पासून साजरी करत आहोत.एखादा व्यक्ति आल्यावर त्याला काहीतरी खावच लागत अशी ही परंपरा आहे.जेवण नाहीतर निदान एक ग्लास आंबिल हे अनिवार्य असतं.

वेळ अमावास्येला लातूर, उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे जिल्हाभर सुट्टी जाहीर केलेली असते;अपवाद असतो तो काही राष्ट्रीय कार्यालय आणि गावागावात जाणार्‍या एसटी बस महामंडळाचा. शहरातील जवळपास सर्व नागरिक कोणाच्यातरी शेतात जतातच जेणेकरून ह्या दिवशी स्थानिक शहरे अघोषित बंद असल्याप्रमाणे ओसाड पडतात.

उत्तरपुजेचे वेळी गवताच्या पेंड्या पेटवुन शेतात फिरवतात व होलगा,होलगा म्हणतात.
होलगा हा शब्द कानडी असावा,पण बहुधा सम्रुध्धी येवु
दे असा काहीसा अर्थ असावा...!!

No comments:

Post a Comment