प्रगती पत्रक नोंदी

सुस्वागतम

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Thursday, 26 October 2017

वडिलांच्या श्राद्धाऐवजी शाळेला दिली देणगी

ओक्टोबर 26, 2017

रुढी-परंपरांच्या नावाखाली वारेमाप खर्च करणं, ही भारतात राहणाऱ्या माणसासाठी आश्चर्याची गोष्ट नाही. व्यक्तीच्या जन्माआधीपासून ते त्याच्या मृत्यूनंतरही सोहळे साजरे करण्याची आपली रीत. पण केवळ परंपरेच्या नावाखाली धार्मिक कृत्यांसाठी खर्च करण्याऐवजी त्याला विधायक आकारही देता येऊ शकतो. असेच एक आदर्श उदाहरण म्हणजे लातूर तालुक्यातील मांजरीची जिल्हा परिषद शाळा. या शाळेसाठी तिथे कार्यरत असणाऱ्या एका शिक्षकाने सुमारे दोन लाख रुपयांची कामं आपल्या दिवंगत वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ करुन दिली आहेत. आज ही शाळा लातूरमधली सर्वांगसुंदर आयएसओ जि.प. शाळा म्हणून ओळखली जाते. या शिक्षकाचे नाव आहे रावसाहेब भामरे.

विद्यार्थ्यांना शिकविण्यात रमलेले रावसाहेब भामरे सर


भामरे सर सध्या लातूरमधील मुरुडच्या डीआयईसीपीडीत तंत्रज्ञान विषय सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत. पण काही वर्षांपूर्वी ते मांजरीच्या जिल्हा परिषद शाळेत अध्यापनाचे काम करीत होते. या स्वागर्ताह पायंड्याविषयी विचारले असता सरांनी सांगितले, “माझे दिवंगत वडील स्वर्गीय माणिकराव भामरे यांच्या निधनानंतर वर्षभराने वर्षश्राद्ध वगैरे धार्मिक कृत्ये करण्याऐवजी मी शाळेसाठी काही चांगले काम करण्याला पसंती दिली. आमचे दिवंगत वडीलही देवभोळे नव्हते, रुढी-परंपरांसाठी पैसा खर्चण्याऐवजी एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा सामाजिक कार्याला देणगी देण्याला त्यांचे प्राधान्य असायचे. त्यामुळे पोलीस इन्स्पेक्टर असणाऱ्या आमच्या वडिलांच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी मला हाच मार्ग योग्य वाटला.”

2015 च्या नोव्हेंबर महिन्यात मांजरी शाळेच्या कायापालटाचे सुरु झालेले काम मार्च 2016 मध्ये संपले. यात भामरे सरांनी दिलेल्या 1 लाख 89 हजारातून शाळेची रंगरंगोटी, इमारत दुरुस्तीची काही कामे आणि गणितपेटीसारखे रचनावादी शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यात आले. मात्र शाळेला परिपूर्ण करण्यासाठी इतरही अनेक कामे करणे गरजेचे होते. त्यासाठीचा वाटा शाळेतील इतर सहकारी शिक्षकांनी आणि मांजरी ग्रामपंचायतीने उचलला. शाळेतील सात शिक्षकांनी सुमारे एक लाख रुपयांचा निधी उभारला तर मांजरी ग्रामपंचायतीने वित्त आयोगाच्या निधीतून एक लाख रुपयांची देणगी शाळेला जाहीर केली. शाळेच्या शिक्षकांची सुरु असलेली धडपड पाहून ग्रामपंचायतीने स्वेच्छेने ही देणगी दिली.

लातूरमधील अंतर्बाह्य सुंदर अशी मांजरी जिल्हा परिषद शाळा

अशा प्रकारे जमा झालेल्या सुमारे चार लाख रुपयांतून मांजरी जिल्हा परिषद शाळेचा कायापालटच घडला. या शाळेत ज्ञानरचनावादी तळफळे चांगल्या दर्जाच्या ऑईलपेंटने रंगवून घेतलेले आहेत, मुलांना बसायला दर्जेदार बेंचेस, डिजिटल वर्गखोली आणि उत्तम स्वच्छतागृहांचीही सोय केलेली आहे. शाळेला आयएसओ नामांकन मिळण्यासाठीचा खर्च तत्कालीन केंद्रप्रमुख गायकवाड आणि विस्ताराधिकारी अलमले सर यांनी उचलला. त्याविषयी बोलताना भामरे सर सांगतात, “शाळेच्या गुणवत्तेसाठी शिक्षक झटत असताना अधिकाऱ्यांनीही आनंदाने आपल्या खिशाला कात्री लावण्याचे कदाचित हे पहिलेच उदाहरण असेल. अधिकारी पूर्ण ताकदीने पाठीशी उभे राहिल्यानेच काम करायला आणखी उत्साह आला.”

लातूरच्या शिक्षकांना प्रशासकीय मदतीसाठी ‘स्टेप’ अॅप


मांजरी शाळेचा कायापालट झाल्यानंतर भामरे सर आता तंत्रज्ञान विषय सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत. ‘एज्युटेक लातूर’ नावाचे यू ट्यूब चॅनेल ते चालवतात. त्यात तंत्रज्ञानाचा अध्यापनात उपयोग कसा करुन घ्यावा, याचे छोटे-छोटे मार्गदर्शन पर व्हिडिओ आहेत. याशिवाय स्टेप आणि इ-कॅलेंडर ही दोन नवी अॅप त्यांनी 2017 साली लॉन्च केलेली आहेत. लातूरच्या गटशिक्षणाधिकारी मा. तृप्ती अंधारे यांच्या संकल्पनेतून ही अॅप्स विकसित करण्यात आली आहेत.

‘Solutions on Teachers Enquiries & Problem’ नावाचे हे अॅप भन्नाट आहे.
शिक्षकांना प्रशासकीय कामांसाठी गटशिक्षणाधिकारी कार्यालय किंवा जिल्हा परिषदेत यावे लागू नये हा या अॅपचा उद्देश आहे. ‘स्टेप’ या अपअंतर्गत शिक्षकांनी आपले काम/ तक्रार/ शंका या अपवर नोंदवायची. त्याचा इमेल लातूरचे सीईओ, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षण सभापती आणि संबंधित विभागाकडे जातो. त्यांच्यामार्फत त्या प्रश्नाचे उत्तर तात्काळ दिले जाते. उत्तर न दिल्यास त्याचे रिमाइंडर पाठवले जाते. शिवाय संबंधित शिक्षकांना त्यांच्या कामाचे काय झाले, याचे अपडेटही वेळोवेळी दिले जाते. काम झाल्यानंतर त्याचे कागदपत्र देणे आवश्यक असेल तर शिक्षकाच्या नोकरीच्या गावच्या पंचायत समितीत ते पाठवले जाते. “या प्रक्रियेमुळे शिक्षकांचा वेळ वाचतो आणि प्रशासकीय कामांवर तो वेळ घालवण्यापेक्षा त्याने अध्यापनावर आणि गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करावे असा आमचा उद्देश आहे”, भामरे सर सांगत होते.

भामरे सरांनी विकसित केलेले ‘इ- कॅलेंडर’ अॅप


दुसरे अॅप आहे ते इ-कॅलेंडर. लातूर तालुक्यातील शिक्षकांच्या शैक्षणिक वर्षाचे नियोजन दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीतच केले जाते. गटशिक्षणाधिकारी अंधारे मॅडम आणि सबंधित अधिकाऱ्यांनी केलेल्या नियोजनाचे कॅलेंडर तयार केले जाते आणि ते या ‘इ कॅलेंडर’च्या माध्यमातून शिक्षकांपर्यंत पोहोचवले जाते. त्यात पालकसभा, माता-पालक मेळावे, कन्या सुरक्षा मंचाचे कार्यक्रम, शिक्षकांच्या बैठका, फिल्म क्लबमध्ये दाखवायचे चित्रपट असे तारीखवार नियोजन असते.

ही दोन्ही अॅप्स गुगल प्ले स्टोअरवरुन लातूरचे शिक्षक मोफत डाऊनलोड करुन घेऊ शकतात. अशा प्रकारे लातूरचा शिक्षण विभाग तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही नवनवे प्रयोग करतोय.
              साभार:-
ब्लॉग: स्नेहल बनसोडे-शेलुडकर.
छायाचित्रे: रावसाहेब भामरे
                संकलन
जयराज नवनाथराव सोदले
जि.प.प्रा.शाळा, बोथी
ता.चाकूर जि.लातूर

=====================================https://www.blogger.com/blogger.g?blogID=1566480817626881410#editor/target=post;postID=3014676983888124824

No comments:

Post a Comment