प्रगती पत्रक नोंदी

सुस्वागतम

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Thursday, 21 December 2017

Appriciation ( *कृतज्ञता* )
            लहानपणी एक केळेवाली दारावर केळी विकायला यायची. रोज आमचे आजोबा केळी घेत. माझी लहान बहीण रोज ती केळी उचलून आत न्यायची.  आणि केळीवाली मावशी तिचा गालगुच्चा घेऊन रोज एक केळं तीला बक्षिस द्यायची. आज विचार केला तर वाटत जवळजवळ दहा टक्के बोनस रोज द्यायची ती कौतुकापोटी. ही बिझनेस स्ट्रॅटेजी नक्कीच नव्हती.
    कुठेही गेलं की भाजी आणायला जायचा छंद आहे मला! बहीण पुण्यात असताना रविवारी आम्ही दोघी जायचो भाजीला. तिची नेहमीची भाजीवाली "ताई आल्या का?" असं तोंडभर हसून म्हणत आग़्रहाने एखादी भाजी अशीच पैसे न घेता पिशवीत ठेवी.  काय हे? कसले ऋणानुबंध? सगळं काही पैशात नाही मोजता येत हेच खरं. हातावर पोट घेऊन जगतानाही किती हे माणूसपण!
     छोटसं अॅप्रिसिएशन! कसल्याही रूपात असो किती सुखावह वाटतं नाही? ते काही पैशातच किंवा भेटवस्तूरुपातच असावं असं नाही. "तू जगातली सर्वात छान आई आहेस" हे छोटुकल्याचे बोल आणि  " Aai u are the  best cook" ही एखाद्या पाककृतीला बोटं चोखत गळ्यात पडत लेकी कडून मिळालेली पावती आपल्याला खरोखर हुरूप देतात. छान ड्रेस घातल्यावर किंवा मनासारखं तयार झाल्यावर स्वतःकडेच एकदा बघा कौतुकाने. World number 1 वाटायला लागतो आपण स्वतःलाच!
जाॅब लागला म्हणून विद्यार्थ्यांनी आठवणीने दिलेला पेढा आणि recommendation letter दिल्यावर शिकायला परदेशात गेलेल्या विद्यार्थ्यांनी teacher's day  ला आठवणीने केलेला मेसेज हे पुरस्कारासारखं वाटून जातं.
     काल आमच्या काकूंनी घरी उमललेलं सुंदर फूल मला भेट दिलं. " ताई  तुम्ही आम्हाला खूप देता. तुम्हाला मी काय देणार? पण तुम्हाला फूलं आवडतात म्हणून पहिलं फूल तुमच्यासाठी आणलं". डोळ्यांच्या कडा नकळत ओलावल्या. किती सहजपणे माझी आवड आणि मनही जपलं त्यांनी ! एक नाजूक नात्याचा गोफ अगदी अलगद वीणला गेला आमच्यात.
   जातायेता केलेलं हलकं अभिवादन, मंदसं ओळखीचं स्मितहास्य, गाडीवरूनही मान तुकवून घेतलेली तुमच्या अस्तित्वाची दखल हेही एक अॅप्रिसिएशनच! एकमेकांमधलं बाॅन्डींग वाढवायला किती मदत करतात या छोट्या छोट्या गोष्टी. परदेशातल्या सारखं thank you , sorry सारखं आपल्याला जमणार नाही.  कदाचित नाटकी वाटेल सुद्धा. वेगवेगळे डेज फॅड वाटेल पण एक मनापासूनच स्मित? जमेल नक्की जमेल. तुम्ही दिलेली कौतुकाची पावती किंवा कष्टांची घेतलेली दखल तिही निव्वळ एका स्मितहास्यातून, नजरेतल्या कौतुकाने किंवा पाठीवर थाप देण्याचा प्रयत्न तरी करून बघा.  एखादीच्या कष्टांच चीज होईल, नविन उभारी देईल ते एखाद्याला.
क्रिटीसाईज काय सगळेच करतात. तुम्ही प्रत्येकाला अॅप्रिशिएट करा अगदी लहानसहान गोष्टीसाठीसुद्धा आणि आपल्या एखाद्या अर्थपूर्ण कृतीने. आणि बघा तुम्हाला सुद्धा त्याचा परतावा कसा मिळतोय ते!

No comments:

Post a Comment